लोकजनशक्ती पक्षात उभी फूट; पाच खासदारांचे बंड
राजकारण

लोकजनशक्ती पक्षात उभी फूट; पाच खासदारांचे बंड

नवी दिल्ली : बिहारमधील लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. या बंडामुळे बिहारच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली. नितीश कुमार हे एक चांगले नेते आणि विकास पुरुष आहेत, असे ते म्हणाले. वास्तविक चिराग पासवान यांनी जनता दल(यू) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर अनेकदा कठोर टीका केली असताना पारस यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यामुळे एलजीपीमध्ये फूट पडल्याचे मानले जाते.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी एलजीपीला जद(यू) विरुद्ध लढण्यास भाग पाडले. परिणामी, निवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब झाली. त्यामुळे पक्षाचे ९९ टक्के कार्यकर्ते नाराज होते, असेही पारस म्हणाले. आपला पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक म्हणून कायम राहील, असे सांगताना चिराग पासवान पक्षाचा भाग म्हणून राहू शकतात असेही पारस यांनी स्पष्ट केले. एलजीपीच्या पाच बंडखोर खासदारांच्या गटाने पारस यांची लोकसभेतील पक्षनेते म्हणून निवड करण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली आहे. प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली कैसर यांचा समावेश असलेला बंडखोर गट बऱ्याच काळापासून चिराग पासवान यांच्या कार्यशैलीवर नाराज होता. त्यांचे वडील रामविलास पासवान यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर चिराग यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. आता ते अक्षरश: एकटे पडले आहेत.