अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
राजकारण

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी; केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तशा मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४लाच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

त्याचबरोबर, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे. सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबात त्याने अजित पवार आणि अनिल परब यांनी आपल्याला वसुली करण्यास सांगितलं अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.