चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो पण त्याअगोदर.., आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना ओपन चॅलेंज
राजकारण

चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो पण त्याअगोदर.., आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना ओपन चॅलेंज

मुंबई : आमचा राजीनामा मागण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनीच राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, हे बंडखोरांचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी आज स्वीकारलं आहे. “चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण त्याअगोदर तुम्हीही राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा, बघुयात कुणाची लोकप्रियता किती आहे…”, असं चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना देऊन त्यांना ललकारलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात आदित्य ठाकरे यांच्यावर विडंबनात्मक चित्र वापरून त्यांना व्यक्तिगत लक्ष्य करत बोचरी टीका केली होती. या टीकेला आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘शिवसेनेशी बेईमानी करुन बंडखोरी केलेल्या गद्दार ४० आमदारांनी राजीनामा द्यावा’, असं आव्हान आतापर्यंत शिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना देत राहिले. गेल्या दीड महिन्यांपासून आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा महाराष्ट्रभर सुरु आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे जिथे जाईल तिथे ते बंडखोरांवर बरसताना सरतेशेवटी गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा, असं आव्हान देत आहेत. त्यांच्या आव्हानाला बंडखोर आमदारांनीही उत्तर दिलं. आमच्या राजीनाम्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनीच राजीनामा द्यावं, असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्याचं हे चॅलेंज देखील आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलंय. त्यांनी वरळीच्या आमदारकीच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यांनी त्याअगोदर बंडखोरांसमोर एक अट ठेवली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे… पण त्याअगोदर तुम्ही राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा. हे सरकार घटनाबाह्य सरकार आहे. विधानसभा बरखास्त करुन उतरा निवडणुकीच्या रिंगणात..जनतेला ठरवू द्या कुणाची लोकप्रियता किती आहे… महाराष्ट्रात जे घडलं ते देशाला हानी पोहोचवणारं होतं. असंच जर देशाच्या इतर राज्यात घडायला लागलं तर देशात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते, कुठल्याही देशाला हे परवडणारं नाही. म्हणून सांगतोय गद्दारांनो द्या राजीनामे आणि उतरा निवडणुकीच्या रिंगणात…”

पोस्टरबाजी करणाऱ्या आमदारांना आदित्य ठाकरेंचं उत्तर- तुमच्या घरातले संस्कार दिसले

आदित्य ठाकरे यांनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारावर सडकून टीका केली. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते तर मुळात यांनी गद्दारी केली नसती आणि आता असे बिचाऱ्यांसारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे शिंदे गटाचे चॅलेंजही स्वीकारले. मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. शिंदे गटाच्या ४० आमदारांनीही त्यांचा राजीनामा द्यावा. विधानसभा विसर्जित करून संपूर्ण राज्यातच निवडणूक घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.