ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या
राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचं समोर आल्यानंतर आता शिंदे गटातही भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग वास्तव्यात साकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गट आणि दलित पँथर एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या संकेतानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातही हालचाली वाढल्या आहेत. दलित पँथरचा 25 नोव्हेंबरला कराडमध्ये भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात दलित पँथरचे काही कार्यकर्ते शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवी प्रकाश आंबेडकर यांची साथ

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना देखील प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती हवीय. अजित पवारांनी आपलं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणं सुरु असल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या निळं वादळ चांगलंच घोंघावताना दिसतंय.

दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी आंबेडर यांनी महाविकास आघाडीला साथ दिली तर आगामी काळात राज्याचं राजकीय गणित नक्कीच वेगळं असण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मोठमोठ्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाल्याचा इतिहास आहे.