राजकारण

मिथुन चक्रवर्तीनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्षांची भेट; राजकारणात पुन्हा एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुंबईतील भेटीपासूनच अभिनेते मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बंगालमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. याचवेळी मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं ते आज भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहन भागवत यांच्या मुंबईतील भेटीपासूनच मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, “भागवत यांच्यासोबतची भेट कौटुबिक होती. खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचं होतं. पण कार्यक्रमामुळे भेटता येत नव्हतं. भागवत यांनी आज माझ्या घरी नाश्ता केला. त्याचबरोबर मलाही सहकुटुंब नागपूरला बोलावलं आहे,” असं उत्तर मिथून यांनी दिलं होतं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

एका भाजपा नेत्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली. यानुसार, मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली. मोदी आज कोलकातात असतानाच मिथून चक्रवर्ती यांनी पूर्वसंध्येला भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मिथून चक्रवर्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं. त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *