राजकारण

‘शिवतीर्थ’वर मनसेची बैठक; राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करणार

मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कंबर कसून कामाला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मनसेचे नेते मुंबईत एकत्र येणार आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे हे आगामी पालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या समित्यांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे या समितीमध्ये कोणाला स्थान मिळणार, तसेच समितीचे नेतृत्व कोणाला दिले जाणार, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी समित्यांची घोषणा केली होती. यावेळी मुंबई निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व सूत्रे हलवत आहेत. त्यामुळे आता मनसे अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देणार का, हे पाहावे लागेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्याच आठवड्यात वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आखण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांमा महत्त्वाच्या सूचनाही दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्वबळावर लढण्याच्यादृष्टीने तयारी करायला सांगितली आहे. युतीच्या चर्चेत न पडता कामाला लागा. एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होतील, हे गृहीत धरुन तयारीला सुरुवात करावी, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचे समजते.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संघटनात्मक पातळीवरही नवी व्युहरचना केली जाणार आहे. त्यानुसार मनसेकडून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय समित्या नेमल्या जाणार आहेत. मनसेची कोअर कमिटी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात अहवाल देणार होती. त्यामुळे राज ठाकरे आज समितीमध्ये कोणाची वर्णी लावणार, हे पाहावे लागेल.

मुंबईत मनसे किंगमेकर ठरण्याची शक्यता

राज्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत असेल. पण गेल्या निवडणुकीप्रमाणे ही लढत अटीतटीची होऊन शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये थोडक्या जागांचा फरक असेल तर सत्ता स्थापनेत मनसे हा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. भाजप-मनसेची ही युती छुप्या स्वरुपाची असेल, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने मुंबईतील कोणत्या जागा कोणासाठी सोडायच्या, याची चर्चा सुरु असल्याचे समजते. तसेच महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष युती होऊ शकली नाही तरी भाजप आणि मनसेमध्ये ‘सहकार्या’चा पॅटर्न आकाराला यावा, यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन या निवडणुकीत अटीतटीची लढत झाल्यास सत्तास्थापनेसाठी ऐनवेळी मनसेची मदत घेता येईल, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचे समजते. मात्र, या सगळ्या घडामोडींबाबत भाजप किंवा मनसेतील नेत्यांकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.