राजकारण

सत्तेचा गैरवापर करून देशाचे वाटोळे करण्याचे काम मोदी सरकार करत आहे – नाना पटोले

पुणे : देशातील सार्वजनिक उपक्रम व राष्ट्रीय संपत्ती नॅशनल मॅान्टायझेशन पाईपलाईन नावाखाली खाजगी ऊद्योगपतींना बहाल करून देशाचे वाटोळे करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे. भाजपपूर्वी देश धोक्यात आहे, म्हणायचे आता मोदी धोक्यात आहेत(?) अशी वल्गना सुरू आहे. दोन वेळा मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून देशाचे वाटोळे करण्याचे काम मोदी सरकार करत आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजीव  गांधी स्मारक समितीच्यावतीने ‘भारतात मोदी सरकारची लोकशाही की खासगीशाही’ या विषयावर फेसबूक लाईव्हद्वारे समारोपाचे – ६वे  चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षीय भाषणात नाना पटोले बोलत होते. या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंतराव माईणकर, रेल्वे मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष सोहनकुमार बोस सहभागी झाले होते.  काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

पटोले म्हणाले, खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात येतील. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य नागरिकांना बँकाची दारं उघडली तर आज मोदी सरकार बँकेत पैसे ठेवायला आणि बँकेतून पैसे काढायलाही पैसे मागत आहे. रेल्वे, विमानतळ, विमानसेवा, बँका, बंदरे, एलआयसी या सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून सार्वभौम देशाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. आपल्या जीवापेक्षा देश महत्वाचा असे मानणारे पंतप्रधान आपल्या देशाने या पुर्वी पाहिले आहेत, पंतप्रधान पदाची गरिमा संपवयांचे काम मोदी करत असल्याची प्रखर टीकाही पटोले यांनी केली.

प्रास्ताविक करताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, आपल्या देशाने स्वातंत्रासाठी फार मोठी किंमत चुकवली असुन स्वातंत्र्यानंतर आपल्याला संविधान मिळाले, एनएमपीची माध्यमातून मोदी सरकार देशाची अस्मिता दर्शवणारे राष्ट्रीय ऊपक्रम, देशाची कोट्यावधींची गुंतवणूक झालेले सार्वजनिक उद्योग खासगी उद्योगपतींना देण्यास निघाले आहे. आपण एकंदर देशाच्या प्रगती व विकासाकडे जातोय की अधोगतीकडे यांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. एका दशकापुर्वी काँग्रेसप्रणित युपीए काळात भारत आर्थिक महासत्ता बनू पहात होता व युपीए काळात २७% जनता दारिद्र्य रेषे बाहेर आली होती, हे विसरता कामा नये.

सोनलकुमार बोस म्हणाले, रेल्वेच्या विविध विभांगांचे खासगीकरण सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, रेल्वे स्वच्छता, तिकीट प्रिंटिंग अशा रेल्वेशी संबधित विविध बाबी नॉन कोअर मध्ये समाविष्ट करून खासगीकरण सुरू झाले आहे. आज रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात सुविधा देते, उद्या खासगीवाले ग्रामीण किंवा दुर्गम भागत सेवा देणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. मग दुर्गम भागांचा विकास होणार कसा? पूर्वोत्तर भागात सैनिक कसे जाणार या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही. रेल्वे तोट्यात आहे म्हणून सरकार त्यांचे खाजगीकरण करीत आहे. पण खाजगीकरण झाल्यावर ते तोट्यात रेल्वे चालवतील का? हा प्रश्न आहे. अन् जर आज रेल्वेचे खाजगीकरण झाले तर तो देशाला आणि भारतीयांना खूप मोठा धोका असणार आहे. रेल्वे वाचण्यासाठी म्हणजेच देशाच्या जीवन वाहीनी साठी नागरीकांनी देखील पुढे आले पाहीजे.

जयंतराव माईणकर म्हणाले, बाबाराव सावरकर यांनी लिहिल्या पुस्तकानुसार जर आपल्याला एखाद्यावर राज्य करायचे असेल तर मध्यवर्गीयांना गरीब करा अन् मोजक्या लोकांच्या हातात पैसा द्या. गेल्या 7 वर्षात हेच होताना दिसत आहे. याकाळात जर कोणी मोठे झाले असतील तर ते केवळ अंबानी आणि आदानी आहेत. नरसिंह रावांनी मनोरंजन व टेलिकॉमच्या क्षेत्रात खाजगीकरण आणले. मात्र हे सरकार ‘फायद्यात असलेल्या उद्योगांचे खाजगीकरण करत आहे तर तोट्यात असलेल्या उद्योगाचे नॅशनलायजेशन’ केले जात आहे. पुढील काळात तर हे उद्योग देखील पूर्णपणे बंदच करून टाकण्याची शंका आहे. ‘हिंदू मसीहा’ अशी इमेज असलेल्या मोदीजींनी नोटबंदी पासून अलीकडच्या शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक चुका केलेल्या आहेत. मात्र केवळ हिंदू वोट बँकवर ते निवडणूक येत आहेत. यांना थोपवण्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. याची सुरूवात बंगाल आणि दिल्लीत झालेली दिसून येते. येणाऱ्या ५ राज्यात जनतेने या विषयी मतपेटीतून आवाज ऊठवणे गरजेचे व देश हिताचे आहे असे ही त्यांनी सांगितले.

खाजगीकरणासाठी मॅानिटायझेशन पाईपलाईन योजना जाहीर झाल्यावर, भारतात, मोदी सरकारची लोकशाही का खाजगीशाही(?) या विषयावर राजीव गांधी स्मारक समितीने सलग ५ चर्चासत्र मालिका घेतल्या. त्या सर्व युट्यूबवर उपलब्ध असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. आभारप्रदर्शन स्मारक समिती सदस्य शशांक पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.