मविआच्या डोक्यात तांबेंचा कार्यक्रम, सत्यजीतला घेरण्यासाठी फिल्डिंग लागली, मातोश्रीवर महिला अपक्ष दाखल
राजकारण

मविआच्या डोक्यात तांबेंचा कार्यक्रम, सत्यजीतला घेरण्यासाठी फिल्डिंग लागली, मातोश्रीवर महिला अपक्ष दाखल

मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. तांबे पितापुत्रांच्या या अनपेक्षित खेळीमुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म असूनही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाचा उमेदवारच नाही. तर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची बिनविरोध निवड होणार, अशी चर्चा सुरु होती. परंतु, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नाशिकची पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राऊत यांच्या या इशाऱ्यानंतर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे नाशिकमधील विजय काळसकर आणि विलास शिंदे हे पदाधिकारीही उपस्थित आहेत. ही बैठक सुरु असतानाच मातोश्रीवर नाशिक पदवी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटासह संपूर्ण महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभी करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे.

मातोश्रीवर सुरु असलेल्या बैठकीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागवाटपाच्या सूत्रात आता बदल होऊ शकतो. त्यानुसार नाशिकची जागा आता ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील मातोश्रीवर असल्याने आता ठाकरे गट त्यांना पुढे करून कोणती खेळी खेळणार, हे पाहावे लागले. तसेच काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पाठिंबा काढून घेतल्यास सत्यजीत तांबे आणि भाजप काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या राजकारणात रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ते कॉमन मिनिमम प्रोगामवर चालत होतं. तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष असतानाही हे सरकार उत्तमप्रकारे चालले. तेव्हा आमच्यात चांगला समन्वय होता. विरोधी पक्षात काम करतानाही हा समन्वय राहिला पाहिजे. तरच आम्ही पुढच्या लढाया एकत्र लढू शकतो. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देता येणार नाही. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळावर शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत, हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती. पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले. या गोंधळास जबाबदार व्यक्ती कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भाजपला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे का, असा खोचक सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *