नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…
राजकारण

नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीच्या निर्णयावरून पश्चाताप व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टोला लगावलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ‘युट्यूब चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत, जोरदार टीका केली होती. ‘शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले, कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसले होते,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, की ‘आम्ही जशास तसे उत्तर’ देण्याचा विचार केला. पण आम्हाला आजही या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. तसं नसतं झालं तर, चांगलं झालं असतं.’ मला माहीत आहे की, त्यावेळी काय घडलं आणि कुणी काय केलं होतं, असंही ते म्हणाले. मी एक पुस्तक लिहित असून, त्यात लवकरच सर्व घटना उजेडात आणणार आहे. महाराष्ट्रात केवळ सरकार आहे, शासन नाही, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. ‘चिड़िया चुग गई खेत…’ या म्हणीचा उल्लेख करत जोरदार टोला लगावला. एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा पश्चाताप करणे व्यर्थ आहे, असे ते म्हणाले. तसेच सत्तेशिवाय त्यांना राहावत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

याआधीही रंगला होता फडणवीस-मलिक ‘सामना’

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. फडणवीस यांच्या दाव्याची खिल्ली उडवली होती. ‘देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की ते दिवाळीनंतर फटाके फोडणार, पण त्यांचे फटाके भिजले आणि त्यांचा आवाजच आला नाही. नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. त्यासाठी काही कागदपत्रे समोर आणली. पण त्यांना ज्यांनी कुणी माहिती दिली ते कच्चे खिलाडी आहेत, असेच मी म्हणेन. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला ही कागदपत्रे दिली असती. यापेक्षा आणखीही बरीच कागदपत्रे आहेत तीही उपलब्ध करून दिली असती’, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला होता. फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबई आणि महाराष्ट्रात अंडरवर्ल्डचा मोठा खेळ चालायचा. फडणवीस यांनी अंडरवर्ल्डला हाताशी धरून या मुंबई शहराला ओलीस ठेवलं होतं. एक आंतरराष्ट्रीय डॉन तेव्हा भारतात आला होता. याबाबत तपशीलवार माहिती देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.