राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…
राजकारण

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी पोस्ट; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका मांडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशात राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे. ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा. मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

धर्मयुद्ध टाळण्याचा शक्यतोवर प्रयत्न करीत असल्याचा सूचक इशारा देत पंकजा मुंडे यांनी माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.