राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?
राजकारण

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?

मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यानंतर आता फेरबदल करण्यात आले. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीनं अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची गृहमंत्री पदावर नियुक्ती केली जाईल, याबाबत अनेज तर्कवितर्क काढले जात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील एका नेत्याचे नाव समोर आले आहे. ते म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. सध्या मंत्रिपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जयंत पाटील शरद पवार यांच्याशी पूर्वीपासून एकनिष्ठ असून अजित पवार यांचाही त्यांच्यावर विश्वास आहे.

पक्षाबरोबर महाविकास आघाडीतील इतर सहकाऱ्यांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. त्यामुळं त्यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव पुढं आलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी यापूर्वी अर्थ, संसदीय कामकाज, ग्रामविकास, जलसंपदा अशी अनेक खाती सांभाळली आहे.

दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला घेरलं आहे. अशातच पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करून सरकारनं विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ पोलीस अधिकाऱ्यांचाच बळी दिला जात असल्याचा आरोप आता सरकारवर होत आहे. पोलीस दलातही नाराजी आहे.

तसंच, अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेतला जावा, असा महाविकास आघाडीमध्येही सूर आहे. त्यामुळं राष्ट्रवादीतही यावर खल सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं. अनिल देशमुख यांनी ही चर्चा फेटाळली असली तरी कालच्या तातडीच्या भेटीमागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख गृहमंत्री पदावर कायम राहतात की त्यांच्या जागी दुसऱ्या कोणत्या नेत्याची वर्णी लागते, हे पाहणे ओउत्सुक्याचे ठरणार आहे.