भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा
राजकारण

भाजपने रणशिंग फुंकले; दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या ३० सभा

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित ०४ राज्यांत आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपनं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भाजपविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तर प्रदेशसारखं राज्य आपल्या ताब्यात असावं, यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दसऱ्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात ३० हून जास्त सभा घेणार आहेत. त्यामध्ये १४ सप्टेंबरला अलिगढ आणि २६ सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शाह यांच्या देखील ५० हून जास्त सभा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे एकीकडे भाजपा आपली आहे ती सत्ता राखण्यासाठी तर विरोधक हे राज्य पुन्हा भाजपकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.