राजकारण

महसूल मंत्र्यांच्या सत्कारासाठी तारेवर आकडा टाकला आणि पाहा काय केलं…

नांदेड : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांचा नांदेडमध्ये सत्कार करण्यात आला. महसूल मंत्र्यांच्या सत्कारासाठी चक्क चोरी करून विजेचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे महसूल मंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान हा वीजचोरीचा प्रकार उघड झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विखे पाटील कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांची महसूलमंत्री पदी निवड झाल्याने विखे हे पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. हदगाव तालुक्यातील वाळकी गावातील शाळेच्या मैदानात हा नागरी सत्कार सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी विखे पाटील कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अत्यंत शिताफीने विजेची चोरी करण्यात आली होती. थेट महसूल मंत्र्यांच्या सत्कारासाठी चोरीच्या विजेचा वापर झाल्याने या प्रकरणी आता काय कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी चोरीच्या विजेचा वापर झाल्याने आयोजक चर्चेत आले आहेत. दरम्यान, महावितरण कंपनी वीज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असते. वीजचोरी प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण अशा पद्धतीने चक्क महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच कार्यक्रमात वीजचोरीचा प्रकार घडला आहे. विखे पाटलांच्या कार्यक्रमासाठी वीजचोरी संदर्भात आयोजकांवर महावितरण कंपनी काय कारवाई करणार? हे लवकरच स्पष्ट होईल.