काँग्रेसला मोठा धक्का; प्रणव मुखर्जींच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का; प्रणव मुखर्जींच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुत्र अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. २०१९ मध्येही काँग्रेसने त्यांना या जागेवरुन तिकीट दिले पण त्यांचा पराभव झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे भाजपच्या जातीय हिंसाचाराच्या लाटेला रोखले, मला विश्वास आहे की भविष्यात इतरांच्या पाठिंब्याने त्या संपूर्ण देशात अशीच कामगिरी करू शकतील असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले. प्राथमिक सभासद वगळता मला काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही गटामध्ये सामील केले नव्हते. म्हणून मी टीएमसीमध्ये सैनिक म्हणून रुजू झालो आहे आणि पक्षाच्या सूचनांनुसार काम करेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते टीएमसीमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.