पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ; नोंदवला हा विक्रम
राजकारण

पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ; नोंदवला हा विक्रम

डेहराडून : भाजपचे पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री झाले आहेत. डेहराडूनमध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजित शपथविधी सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबीरानी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. गेल्या साडेचार वर्षांत उत्तराखंडला तिसरा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत, तीरथ सिंह रावत हे दोन मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. धामी हे राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत ११ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सतपाल महाराज, डॉ. हरक सिंह रावत, यशपाल आर्य, डॉ. धन सिंह रावत, बिशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, यतेश्वरानंद आणि बंशीधर भगत यांचा समावेश आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून असल्याने धामी यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. लखनऊमध्ये ९०च्या दशकात विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी त्यांनी संभाळली होती. राजनाथ सिंह त्यांच्या कामाने त्यावेळी प्रभावित झाले होते. तेव्हापासून धामी हे सतत राजनाथ सिंहांच्या संपर्कात राहिले. धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचेही निकटवर्तीय आहेत. कोश्यारी यांचे बोट धरून धामी यांनी राजकारणात प्रवेश केला, असं बोललं जातं.

पुष्कर सिंह धामी यांचा जन्म हा पिथोरागढच्या टुंडी गावात १६ सप्टेंबर १९७५ ला झाला. लखनऊ विद्यापीठात त्यांनी व्यावसायिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ९०च्या दशकात एबीव्हीपीच्या अनेक पदांवर काम केलं. दोन वेळा ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. २०१२ मध्ये खटीमा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. सलग दुसऱ्यांदा ते खटीमामधून आमदार झाले.