बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल
राजकारण

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली : गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. रवी दिशाच्या या अटकेवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. दिशा रवी हिला अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीतील राजकारण तापलं आहे. दिशा रवीला अटक केल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत गळचेपी केला जात असल्याचं आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काही घटनांच्या बातम्या ट्विट केल्या आहे.

यात ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे. या तीन बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेतील ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर “ते (मोदी सरकार) घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही,” असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दिशा रवी २२ वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं २०१८ मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं २०१९ मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते. हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.