भाऊ भावाच्या मदतीला ! उद्धव ठाकरेनंतर राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या पाच मागण्या
राजकारण

भाऊ भावाच्या मदतीला ! उद्धव ठाकरेनंतर राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या पाच मागण्या

मुंबई : राज्यातील १५ दिवसांच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काल राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसंच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. तसंच राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी. अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

राज ठाकरेंचा मोदींना सवाल
करोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.