राजकारण

मुंबई महाराष्ट्राच्या प्रश्नावर शंखनाद करणाऱ्या राज ठाकरेंचा कंगनाला ‘मनसे’ पाठिंबा?

मुंबई किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ज्या ज्या वेळी उपस्थित होतो, त्यावेळी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरते हा इतिहास आहे. तो कित्येक वेळा महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे. पण, सध्या महाराष्ट्रात एक नवा वाद उदयाला आला आहे. अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या विरोधातील वक्तव्याने हा वाद निर्माण झाला. या वादात शिवसेना ही कंगनाच्या रडावर असल्याने वाद वाढत गेला. त्याला नेटीझन्स, मराठी कलाकार आणि राजकिय पक्षाच्या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडले. मराठी माणूस कंगनाच्या वक्तव्यांनी वारंवार दुखावत गेला. पण, याचवेळी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर सातत्याने शंखनाद करणाऱ्या राज ठाकरेंनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याच नेत्यांने साधा शब्दही काढला नाही. यावरून राज ठाकरेंच्या हेतुविषयीच शंका उपस्थित होऊ लागल्या असून कंनाला राज ठाकरेंचा पाठिंबा आहे काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्यंगचित्रकार असणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातूनही सातत्याने मराठी अस्मितेवर परखडपणे बोट ठेवलं आहे. देशातील अन्य सर्व राज्यांच्या अस्मिता एकसंघ आहेत, मात्र मराठी अस्मिताच ठिगळं लागलेली असल्याचं राज ठाकरेंनी एक व्यंगचित्रही २०१८साली रेखाटलं होतं. पण, अगदी अशाच प्रकारची ठिगळं लावलेली राज ठाकरे यांचीच मराठी अस्मिता आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. परप्रांतियांचा मुद्दा, मुंबईतील मराठी माणसाच्या नोकऱ्यांचा प्रश्न, तसेच मुंबईतील दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा हट्ट असो, अशा प्रत्येकवेळी राज ठाकरेंच्या मनसेने मराठी अस्मितेचा मुद्दा जागा केला. याच मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर निवडणुकांही लढवल्या, काही ठिकाणी यशही मिळवले. मग, आता बाहेर राज्यातून आलेल्या कंगनाच्या महाराष्ट्र आणि मुंबईद्वेषी शब्दांबद्दल राज ठाकरे यांना काहीच वाटू नये, हे मराठी माणसाला विचार करण्यास भाग पाडणारे आहे.

राज ठाकरे गप्प का?
राज ठाकरे यांच्या पक्षाने आता मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्ववादाचा अजेंडा रेटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा मराठीचा मुद्दा आता मागे पडत म्हणून मनसे कंगना प्रकरणात शांत आहे, असा कयास काहीजण सोशल मीडियावर बांधत असले तरी, मुळ मुद्दा हा कंगनाला विरोध म्हणजे शिवसेनेला समर्थन असा अर्थ होऊ शकतो. याच अनुषंगाने राज ठाकरेंच्या मनसेने या प्रकरणात शांत राहण्याचा निर्णय घेतला असेल, असाही अंदाज बांधला जात आहे. पण, मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावला जात असताना राज ठाकरेंच्या मनसेने गप्प राहणे हे मराठी माणसाला रुचलेले नाही हेही तितकेच खरे !

प्रकरण काय?
कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची दिलेली उपमा महाराष्ट्राच्या जिव्हारी
मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिलेली अनेकांच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस, रितेश देशमुख उर्मिला मातोंडकर आदी कलाकारांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं म्हटलं. मात्र, मनसेने तेव्हांही कुठल्याही प्रकाची प्रतिक्रिया दिली नाही.

मी मुंबईला येणारच असल्याचे कंगनाने जाहीर केल्यानंतर मात्र, केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा पुरविली आणि ती मुंबईत हजर झाली. मात्र, त्याची दिवशी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर अनाधिकृत बांधकामाच्या नावाखाली जेसीबी चालवला. त्यानंतर संतापलेल्या कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. या सर्व प्रकरणातही मनसेने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत