शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!
राजकारण

शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!

पालघर : राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल लागत असताना अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे आडाखे चुकल्याचं देखील दिसून येत आहे. अशातच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. गेल्या ८ वर्षांपासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या राजेंद्र गावित यांना आपल्याच मुलाला तिथून निवडून आणण्यात अपयश आल्याचं निकालातून दिसून आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेंद्र गावित यांचं पालघरमधील प्रस्थ सर्वश्रुत असल्यामुळे रोहित गावित यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांनी रोहित गावित यांचा पराभव करत एक प्रकारे राजेंद्र गावितांनाच पराभूत केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

राजेंद्र गावित यांनी आपल्या मुलाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र, यावेळी तिकिटासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी इच्छुक होते असं सांगितलं जात आहे. त्यांना उमेदवारी नाकारून रोहित गावित यांना उमेदवारी देणयात आल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. चुरी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचाच फटका गावित यांना बसल्याचं आता बोललं जात आहे.