औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतरणाचा मुद्दा चांगलाच उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. ”काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचं सरकार राज्यात होतं तरीही या दोन शहराचं नामांतर होऊ शकलं नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने मात्र शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. “औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. भाजपासोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेस शिवसेनेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही? हा खरा सवाल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय.” असंही राम कदम यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, त्याआधी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नामांतराच्या मुद्द्यावर भूमिका मांडत भाजपावर टीकास्त्र डागलं. “औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले, त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका!”, असा सवाल ‘सामना’तून करण्यात आला आहे.