राजकारण

राज्यात नवरात्रीत रामलीला साजरी करण्यासाठी राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे. याविषयी पत्र लिहून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे रामलीलेच्या आयोजनाची परवानगी मागितली आहे. एकीकडे राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना  दुसरीकडे भाजपाकडून राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत वारंवार मागणी होत आहे. आता मुख्यमंत्री राम कदमांच्या मागणीला  काय उत्तर देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशा परिस्थितीत राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना नवरात्रीत अटी आणि नियमानुसार रामलीलेचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र लिहिले आहे. ”महाराष्ट्रात रामलीला साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मी हे पत्र लिहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात रामलीला साजरी केली जाते. तथापि, कोविड -१९ च्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी आणि सुरक्षा उपाययोजनांच्या आधारे परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी हिंदू धार्मिक संघटनांकडून मागणी केली जात आहे. आम्हालाही असे वाटते की धार्मिक स्थळे उघडण्याची आवश्यकता आहे जेणेकरून या कठीण काळात भाविक मंदिरांमध्ये प्रार्थना करू शकतील. त्याचप्रमाणे राज्यभर रामलीला साजरी केली जावी यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी आमची विनंती आहे. सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.” अशी मागणी राम कदमांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या चारशे -पाचशे वर्षांची पंढरपूरच्या वारीची परंपरा खंडित झाली. ईद’ही यावर्षी सर्व भाविकांनी घरीच साजरी केली. दीक्षाभूमीवरील कार्यक्रमही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आल्या. देशभरातील सण, उत्सव, मोठमोठ्या यात्रा रद्द केल्या गेल्या. अशा परिस्थितीत राज्यसरकार सर्व अटी आणि नियमांचे पालन लागू करून परवानगी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत