धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला

मुंबई : हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोपा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या टीकेला सचिन सावंत यांनी खोचक शैलीतील ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ”हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी खोचक टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून सचिन सावंत यांना प्रत्युत्तर दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, किरीट सोमय्यांचा अपवाद वगळता धनंजय मुंडे प्रकरणावर आतापर्यंत भाजपच्या एकाही बड्या नेत्याने भाष्य केलेले नाही. त्यामुळे या सगळ्यात भाजप एकूणच सावध भूमिका घेताना दिसत आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना पाच मुले असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

तसेच, ” धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.