मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला
राजकारण

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : “कोरोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय  राऊत यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “मी स्वत दंड भरला आहे. दिल्लीत असताना गाडीत बसलो होतो तेव्हा माझा मास्क खाली आला होता. विमानतळासमोर माझी गाडी दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात आली. माझे पीए सोमनाथ समोर बसले होते. त्यांनी काय झालं विचारलं असता तुमच्या साहेबांनी मास्क घातला नसल्याचं सांगितलं. सोमनाथ यांनी खासदारसाहेब असल्याचं सांगितल्यानंतर पोलिसानेही खासदारांनीच कायदा तयार केलं असल्याची सांगितलं. मी ताबडतबोत सोमनाथ यांना आपली चूक आहे, वाद घालायचा नाही. नियम आहे त्याप्रमाणे दंड भरायचा सांगितलं,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून यावेळीही त्यांनी मास्क घातलेला नव्हता.  राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक पोहोचले होते, यावेळी राज ठाकरे यांनी त्यांनाही मास्क काढण्याच्या सूचना केल्या. राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित अनेक कार्यकर्ते मास्कविनाच उपस्थित होते.

दरम्यान, मनसेने २७ फेब्रुवारीला दादरमध्ये आयोजित केलेली मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेच्या फलकावर राज यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना राज ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी एका पत्रकाराने राज यांना तुम्ही मास्क घातलं नाही, असा प्रश्न विचारला असता “मी घालत पण नाही,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी, “मी तुम्हालाही सांगतो,” असं म्हणत तिथून निघून गेले.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे २०२० मध्ये महिन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती, तिथेही राज ठाकरे मास्क न घालताच गेले होते. राज यांच्या पाठोपाठ विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीसही आणि प्रविण दरेकर देखील मंत्रालयामध्ये दाखल झाले. या दोघांनाही नियमांचे पालन करत मास्क घातला होता. मात्र राज यांनी मास्क बंधनकारक असतानाही घातलं नव्हतं. याचसंदर्भात पत्रकारांनी नंतर प्रश्न विचारला असता राज यांनी, “सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही”, असं उत्तर दिलं होतं.