मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा
राजकारण

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा

मुंबई : “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? कि त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय ?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटायला गेला असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यासाठी आज ते बॉलीवूडमधील काही चित्रपट निर्माते आणि उद्योजकांशी आणि अभिनेत्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे.

त्याचबरोबर चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा आदित्यनाथ यांचा डाव असल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर कोणाला जोरजबरदस्तीने राज्यातून उद्योगांना जाऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या पार्श्वभूमीवर दिला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गुंतवणूकीबाबत ज्येष्ठ उद्योगपती, उद्योग समूहांच्या उच्चपदस्थांशी आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांशी योगी आदित्यनाथ विचारविनिमय करून त्यांना आमंत्रित करणार आहेत. यामध्ये टाटा, एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी आदी मान्यवरांचा समावेश आहे. शिवाय, सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर देखील ट्रायडेंट हॉटेलमध्ये योगींची बैठक होणार आहे.