नेत्यांची सुरक्षा कमी करण्याबाबत संजय राऊतांचा मोठा खुलासा
राजकारण

नेत्यांची सुरक्षा कमी करण्याबाबत संजय राऊतांचा मोठा खुलासा

मुंबई : “नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण झालेलं नाही. याआधी आमच्याही सुरक्षा काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. मागच्या वेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दाने तक्रार केली नाही.” असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजपा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेत भाजपाला चांगलाच धक्का दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा सूडबुद्दीने वागावं असा ट्रेण्ड राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकत नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत ही भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभेचं अध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे आहे. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद बदललं जात असून जी काही नावं आहेत त्यात नाना पटोलेंचं नाव असल्याचं मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.