मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर पवारांनी गृहमंत्र्यांना फोन करत केली ‘ही’ मागणी
राजकारण

मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर पवारांनी गृहमंत्र्यांना फोन करत केली ‘ही’ मागणी

मुंबई : राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना फोन करत एक मागणी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःची सुरक्षा कमी करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. स्वतः देशमुख यांनी याची माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गृहमंत्री अनिल देशमुख यासंदर्भात बोलताना म्हणाले, गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असं पवार यांनी फोन करून सांगितलं. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका आहे? यावरून सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवालावरून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आहे म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही. समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, सुरक्षेत कपात करण्यावरून ठाकरे सरकारवर टीकाही होऊ लागली आहे. यापुढेही शरद पवार पत्र लिहून सुरक्षा कमी करण्याची मागणी करणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.