पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर
राजकारण

पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणी केलेल्या टीकेला शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेतेही आक्रमक झालेले दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच प्रकरणावरून ‘पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसात काहींना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सखोल चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असं ठाकरे म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकरणाचं गांभीर्य नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे कोण आयुष्यातून उठलं हे कळेल, असा सल्ला फडणवीसांना दिला आहे.