बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला
राजकारण

बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या स्वाभिमानावर हल्ला

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाची शिवसेनेवरील नाराजी लपून राहिलेली नाही. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी भाजपा नेते सोडत नाहीत. दरम्यान आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.२३) राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांची भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केलं. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही व्हिडीओच्या माध्यमातून केल्याचं दिसत आहे.

यात सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधानं या व्हिडीओत घेतलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेत आलेल्या शिवसेनेवर भाजपाकडून सतत हिंदुत्वावरून निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. मंदिरं सुरू करण्यावरून भाजपाने शिवसेनेला हिंदुत्वाचा वारंवार हवाला दिला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत असून, शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीकाही भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा फडणवीस यांनी त्याच मुद्द्यावर बोट ठेवत शिवसेनेला टोला लगावला आहे.