गांधी परिवाराशिवाय अध्यक्ष हवा? काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार का? शशी थरुर यांची मोठी घोषणा
राजकारण

गांधी परिवाराशिवाय अध्यक्ष हवा? काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार का? शशी थरुर यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: लोकसभेच्या सलग २ निवडणुकांत झालेले पराभव, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल, त्यानंतर विविध मार्गांनी काँग्रेसची सरकारं सत्तेतून जाणं, नेत्यांपाठीमागचा चौकशीचा ससेमिरा त्यात आता गुजरात, हिमाचल आणि हरियाणा राज्याच्या आणि २०२४ ची लोकसभेची तोंडावर येऊन ठेपलेली निवडणूक अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. येत्या १७ ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने घेतला आहे. अध्यक्षपदासाठी गांधी परिवारातलं कुणीही नको, अशी अनेकांची धारणा आहे. राहुल गांधींनीही त्यासंबंधीची तयारी दाखवली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? आपण स्वत:ला त्या शर्यतीत मानता का? असा प्रश्न शशी थरुर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी उघड उघड उत्तर दिलं. “मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, या केवळ चर्चा आहेत. लोक केवळ अटकळ बांधत आहेत. मी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. फक्त अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर पक्षासाठी ती निश्चित चांगली गोष्ट राहिल, असं मी म्हटलं. काँग्रेस पक्षाची विचारसरणी, आतापर्यंत पक्षाचं काम, ध्येयधोरणे यावर लोक चर्चा करतील, जी सध्या होत नाही”

गांधी परिवाराशिवाय अध्यक्ष हवा? आपलं मत काय आहे? या प्रश्नावर शशी थरुर म्हणाले, “गांधी परिवारातील कुणीही निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी आधीच सांगितलं आहे. हे सर्वोच्च पद घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणालाही पाठिंबा देण्याची तयारी ठेवली आहे. लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी पुढे येऊन भाग घ्यावा. हे पार्टीसाठी चांगले आहे, असं मला वाटतं”