पुण्यात शिवसेना नेत्याची गुंडगिरी; हॉटेलवर गोळीबार करत महिलांना मारहाण
राजकारण

पुण्यात शिवसेना नेत्याची गुंडगिरी; हॉटेलवर गोळीबार करत महिलांना मारहाण

पुणे : पुण्यात शिवसेना नेत्याने गुंडगिरी केली असून सिंहगड परिसरात महिलांना मारहाण करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. राजकीय वादातून 40 ते 50 गुंडांसह गोळीबार करत सशस्त्र हल्ला केला असून पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी सिंहगड परिसरात असलेल्या खडकवासला गावच्या हद्दीत एका हॉटेलवर हल्ला केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेत खेड पंचायत समितीच्या महिला आणि पुरुष सदस्यांना तसंच महिला सदस्यांच्या पतींना देखील गंभीर दुखापत झाली आहे. हॉटेलवर झालेल्या या हल्ल्यामुळे हवेली पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे 24 मे रोजी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या अविश्वास ठरावावर येत्या 31 मे ला मतदान होणार आहे.

पोखरकर यांच्यावर याआधी बरेच गंभीर गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे पोखरकर यांच्या दहशतीला घाबरुन खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे 6 सदस्य, भाजपचे एक सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य सिंहगड परिसरातील एका हॉटेलवर आपल्या परिवारासह येऊन थांबले होते. भगवान पोखरकर काल रात्रीपासूनच गुंडांसह या सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भगवान पोखरकर आणि त्यांनी आणलेल्या गुंडांनी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोखरकर यांच्या गुंडांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या महिला पंचायत समिती सदस्यांच्या रुमचे दरवाजे तोडले. त्यानंतर महिला सदस्यांसह त्यांच्या पतींना कोयता, गज आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.