महाविकासआघाडीत पळवा-पळवी सुरुच; शिवसेनेचा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

महाविकासआघाडीत पळवा-पळवी सुरुच; शिवसेनेचा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर : महाविकासआघाडीतील पळवा पळवी सुरुच असून सोलापूरातील शिवसेनेचा मोठा नेता राष्ट्रवादीचा गळाला लागला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोणतीही अट न ठेवता आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असलो तरी आमदारकीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होईल, असा आशावादही कोठे यांनी बाळगला आहे. महाविकास आघाडीची सत्ता टिकविताना शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये कोणीही एकमेकांचा पक्षाला खिंडार पाडायचा नाही, असे अलिखित ठरले आहे. तरीही शिवसेनेचे महेश कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात असताना राष्ट्रवादीने सोलापुरात शिवसेनेत लगेचच खिंडार पाडायचे नाही, असे ठरविल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, महेश कोठे हे तूर्त एकटेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

शिवसेनेत त्यांच्या घरातीलच चार नगरसेवक आहेत. याशिवाय अन्य निकटचे नातेवाईक असलेले तीन नगरसेवक आहेत. तसेच त्यांच्यावर निष्ठा वाहिलेले अन्य सात नगरसेवक आहेत. मनात आणले तर हे सर्व १४ नगरसेवक शिवसेनेतून फुटून राष्ट्रवादीत जाऊ शकतात. परंतु, कोठे यांचे कट्टर समर्थक असलेले सर्व नगरसेवकांना तूर्त शिवसेनेत राहण्याच्या या राजकीय खेळीमागे महेश कोठे यांचा आणखी काही डाव असू शकतो, असे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते.

कोठे यांनी यापूर्वी २००९ साली सोलापूर शहर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटिवर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर २०१४साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची माळही घालण्यात आली होती. मात्र दोनवेळा पराभव होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी मागील २०१९ साली शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी हाती घेतली असता शिवसेनेने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे सेना बंडखोर म्हणून आपले भवितव्य अजमावून पाहिले. परंतु तिसऱ्यांदा पदरी निराशाच आली होती.