राजकारण

ठरलं! शिवाजी पार्क नव्हे, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा सलग दुसऱ्या वर्षी अन्य ठिकाणी होणार आहे. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची चिन्हं दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर व उद्धव ठाकरे यांच्या रूपानं शिवसैनिक मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन घेण्यात आला होता. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी मोजक्या नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं होतं. हे भाषण शिवसैनिकांनी ऑनलाइन ऐकलं होतं.

यंदा करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळं दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, अशी शक्यता होती. मात्र, खुद्द राऊत यांनीच आज याबाबत माहिती दिली. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नव्हे तर षण्मुखानंद सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल, असं त्यांनी सांगितलं. हा मेळावा ५० टक्के शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार असला तरी त्याच जोषात होईल, असं संजय राऊत यांनी आज सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *