शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य
राजकारण

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गितेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. यानिमित्त रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद पुन्हा डोकं वर काढू लागल्याचं दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञातवासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.