त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग दंडवत,” असे म्हणत दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संपादक संजय राऊत यांनी लेख लिहित कॉंग्रेसवर टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं. मात्र बाहेर काँग्रेस शिवसेनेत कितीही सामना रंगला असला, तरी ठाकरे सरकार मात्र स्थिर असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनीच याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

“महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही,” असं स्पष्ट करत अप्रत्यक्षरीत्या भाजपाला उत्तर दिलं आहे.

तसेच, “राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,” असा इशारा देत थोरात यांनी दिला आहे.