म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका
राजकारण

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, अशी सणसणीत टीका देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारवर केली आहे. तसेच, असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचं उद्घाटनं करताना डॉ. मनमोहन सिंह यांनी यावर भाष्य केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, “संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही. देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
तसेच, सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केलं. तसंच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, “या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. यातून राज्याला पुढे न्यायाचं आहे. डिजिटल प्रणालीमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत आहे. परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोकं देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत,” असंही मनमोहन सिंह म्हणाले.