पंतप्रधान ११ जानेवारीला घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
राजकारण

पंतप्रधान ११ जानेवारीला घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली : देशात भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाशी संबंधित केंद्राची योजना काय आहे, यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या लसीकरणाच्या रोलआउट वेळी उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण आदी माहिती घेण्यासाठी नुकतंच नॅशनल ड्राय रनदेखील करण्यात आलं होतं.

दरम्यान, पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या लसीची उपलब्धता करुन देणं हे सरकारचं मोठं यश आहे. त्यासाठी कोरोनाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणावर अभियान सुरु करण्यात येणार आहे.

पक्षाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत. यामध्ये पक्षाचा प्रत्येक नेता सामील होणार आहे. त्याचबरोबर, 29 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सुरु होणार आहे. या दरम्यान राज्यसभा आणि लोकसभेचे पीठासन अधिकारी लसीकरणाच्या प्राथमिकतेच्या विषयावर सरकारशी चर्चा करणार असल्याची ही माहिती समोर आली आहे.