हा तर लोकशाहीचा अवमान; अमेरिकेच्या संसद हल्ल्याच्या घटनेवर ‘या’ बड्या नेत्याची सडकून टीका
राजकारण

हा तर लोकशाहीचा अवमान; अमेरिकेच्या संसद हल्ल्याच्या घटनेवर ‘या’ बड्या नेत्याची सडकून टीका

अमेरिकेतील संसदेवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. भारतातही या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा; लोकशाहीचा अवमान केला, असे शब्दात आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेवर आपली रामदास आठवले यांनी सडकून टीका केली आहे. या घटनेबाबत बोलताना ते  म्हणाले की, ”अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आम्हाला आदर होता, मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाहीविरोधी आणि रिपब्लिकन प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी मात्र याउलट कृती करून सतःची प्रतिमा कलंकित करून घेतली आहे.”

“भारतात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाहीच्या न्यायानुसर बहुमताचा; जनमताचा सन्मान केला जातो. मात्र जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही,” असा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे.

आठवले पुढे म्हणाले की, ”अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या विजयला संमती देण्यात आडकाठी आणायचे हीन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे.” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच, “अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे,” असेही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.