हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक

पुणे : ” हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि जनतेच आभार मानतो.” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.

या विजयावर शरद पवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या वर्षभर काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागपूरची जागा कधीच मिळाली नव्हती तो गड कॉंग्रेसने जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं यश आहे. पुणे मतदारसंघातही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे.

यावेळी बोलायाना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ”भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधानपरिषदेला चंद्रकांत दादा कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील विजयी उमेदवारांचं अभिनंदन केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक आहे. आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे आभार. महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.