राजकारण

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटणाऱ्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये

नवी दिल्ली : ”राज्याच्या राज्यपालांनी राजकीय भूमिकेत राहून राज्यपालांनी काम करु नये. पंतप्रधान, राज्यपाल ही सर्व धर्मनिरपेक्ष पदे आहेत. आपली घटनाही धर्मनिरपेक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याने सर्वांना अडचण होत आहे. कट कारस्थान करुन सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल, तर मूर्खपणाचं आहे. ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटतं, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम करावं. आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की संघर्ष करायचा. राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानात राहून काम करावं.” याचशिवाय ”भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यातच असा प्रयोग का केला जात आहे?, तसेच, पश्चिम बंगालचे राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करत आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? भाजपशासित राज्यात मंदिरं का उघडली नाहीत?” असा सवाल त्यांनी विचारला. त्याचबरोबर ”राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं.” असेही त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रावर निसर्गाचं संकट आहे. पूरस्थितीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. बिहारमध्ये शिवसेना 40 जागा लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली. दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धार्मिक स्थळे उघडण्याबाबत पत्र लिहिले होते.

यामध्ये ”हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील “माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उत्तरही दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत