राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली. यावेळी उदयन राजे यांनी आज पुन्हा उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ”राज्य सरकारने मराठा आरक्षणाप्रकरणी दोन अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यातील एका अर्जात सर्व राज्य सरकारना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. तर, दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. मात्र जर अशा पद्धतीने खटल्यांचे कामकाज सुरु राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केसपण प्रलंबित राहील.’

‘केस प्रलंबित राहिल्यास मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रुपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष घालावे. तसेच, मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये. तशा सूचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावाला, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आधीही त्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पवारांनी त्यात लक्ष घालावं, अशी मागणी उदयनराजेंनी केली होती.