कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?
राजकारण

कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयातून कोर्टाच्या दिशेने निघत असताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि ईडीच्या एका अधिकाऱ्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आले होते. संजय राऊत या सगळ्यांशी बोलत उभे राहिले होते. तेव्हा राऊत यांच्यासोबत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने त्यांना हटकले. तुम्ही अशाप्रकारे इतरांशी बोलू शकत नाही. तुम्ही ईडीच्या कोठडीत आहात, त्यामुळे ही गोष्ट योग्य नाही. आपल्याला कोर्टात निघायचे आहे, असे या अधिकाऱ्याने संजय राऊत यांना सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळे संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला. त्यानंतर संजय राऊत गाडीच्या दिशेने गेले, मात्र गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी फुटबोर्डवर उभे राहत हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झाले. ईडीने संजय राऊत यांची कालच वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यामध्ये संजय राऊत यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसून आले होते.

पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आज राऊत यांना पुन्हा ईडी अधिकाऱ्यांकडून कोर्टात नेण्यात आले.