मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंचे अशोक चव्हाणांवर टीकास्त्र
राजकारण

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंचे अशोक चव्हाणांवर टीकास्त्र

मुंबई : ”अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत,” असा घणाघाती आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीवरून विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणावर येत्या 25 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेशही पाळले नाहीत. पण चव्हाण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले आहेत, असा आरोप मेटे यांनी केला होता. चव्हाण मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

”मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या नावाखाली चव्हाण हे दिल्लीत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव हे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे ते लॉबिंग करत आहेत.

मेटे पुढे म्हणाले की, चव्हाणांनी काल दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बैठक घेतली असं सांगून मराठा समाजाची व राज्याची फसवणूक केली आहे. या बैठकीला अभिषेक मनु सिंघवी वगळता कोणताच वकील उपस्थि नव्हता, असं सांगतानाच चव्हाणांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना का बोलावले नाही? असा सवालही त्यांनी केला.