भाजपा महिला मोर्चाचा इशारा; धनंजय मुंडे राजीनामा द्या, अन्यथा….
राजकारण

भाजपा महिला मोर्चाचा इशारा; धनंजय मुंडे राजीनामा द्या, अन्यथा….

मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सविस्तर खुलासा करत सहमतीनं संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचं सांगत उमा खापरे यांनी धनंजय मुंडेना इशाराही दिला आहे. ” धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तसेच, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत मदतीची साद घातली आहे.