नवीन विधानसभा अध्यक्ष कोण? या तीन नावांची चर्चा
राजकारण

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण? या तीन नावांची चर्चा

मुंबई : काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.