कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा
राजकारण

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यसरकार तातडीच्या उपाययोजना राबवत आहे. तसेच, नागरिकांची गर्दी रोखण्यासाठीही पावले उचलली आहेत. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीदेखील राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्चे काढू नयेत. तसेच माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आता याच मुद्द्यावरून महाराष्ट्र भाजपाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाचा एक फोटो पोस्ट करुन, आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “हा बघा जितेंद्र आव्हाड यांचा कार्यक्रम. ते आपल्या राज्याचे सन्माननीय गृहनिर्माणमंत्री आहेत. अशा कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे त्यांना कोण समजावणार? “असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला टि्वट टॅग केले आहे. तसेच, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचा एक फोटोही भाजपाने पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टि्वट टॅग केलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे कळकळीचं आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.