एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
राजकारण

एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्पोटक प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खलबत रंगली आहेत. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती. या भेटीनंतर गृहमंत्री देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटक सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ”मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही.

त्याचबरोबर, विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शरद पवारांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल.”

मात्र माध्यमांनी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदलीच्या विषयावर विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्याचं गृहमंत्र्यांनी टाळलं. मुंबई पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन नाही. चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की, चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी त्यांना बाजूला केलं, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं.