तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम
राजकारण

तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

नवी दिल्ली : ”आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केले होते. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित एका कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मात्र त्यांच्या या एका विधानामुळे सर्वच स्तरातून रावत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच” असं रावत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.

मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं” असंही रावत यांनी म्हटलं आहे.

इतकच नव्हे तर त्यांनी तरुणांमधील व्यसनाचाही उल्लेख केला. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल, असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा घडत आहेत. रावत यांच्या विधानानंतर अनेक महिला नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

त्यात आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही ट्विट करत रावत यांच्या विधानावरुन भाजपला टोला लगावला आहे. “फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा नक्की सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय करणार?”, असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थित केला आहे.