आयपीएलचे वेळापत्रक आलं; या मैदानावर रंगणार शेवटचा सामना
क्रीडा

आयपीएलचे वेळापत्रक आलं; या मैदानावर रंगणार शेवटचा सामना

नवी दिल्ली : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१चे वेळापत्रक जाहीर केले असून जवळपास दोन वर्षानंतर भारतात आयपीएल स्पर्धा होणार आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

९ एप्रिल २०२१ रोजी चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल. प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. ५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील.

गेल्या वर्षी युएईमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळून यशस्वीरित्या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर, बीसीसीआयला आत्मविश्वास आहे की खेळाडूंचे तसेच त्यामध्ये सहभागी होण्याऱ्या इतर सर्व लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेवून या आयपीएलचे आयोजन केले जाईल.