क्रीडा

IPL 2020 : हैद्राबादवरील विजयासह चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान कायम

IPL 2020 : हैद्राबादविरूद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह चेन्नईचे आता सहा गुण झाले असून चेन्नई सहाव्या स्थानावर आहे. तर हैद्राबादचेही सहाच गुण आहेत. पण, नेट रनरेटच्या निकषानुसार पाचव्या स्थानावर आहेत. नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १६७ धावा केल्या होत्या. त्यात शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीच्या ८१ धावांच्या भागीदारीचे मोठे योगदान होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादचे फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (९), मनिष पांडे (४), विजय शकंर (१२), प्रियम गर्ग (१६) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. हैद्राबादकडून अनुभवी केन विल्यमसनने एकाकी झुंज देत अर्धशतक (५७) ठोकले, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. हैद्राबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

स्पर्धेत पहिल्यांदा सीएसकेला आधी फलंदाजीची संधी मिळाली. नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. सॅम करनने फटकेबाजी केली, पण त्याला संदीप शर्माने ३१ धावांवर त्रिफळाचीत केला. त्यानंतर शेन वॉटसन आणि रायडु यांनी डाव सावरत ८१ धावांची भागीदारी केली. पण दोघांनाही अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. वॉटसन ४२ तर रायडू ४१ धावांवर माघारी परतला. धोनीने २ चौकार आणि १ षटकार खेचत थोडी चमक दाखवली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २१ धावांवर बाद झाला. पण रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत तळ ठोकत १० चेंडूत नाबाद २५ धावा कुटल्या आणि चेन्नईला १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. हैद्राबादकडून संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांना २-२ बळी मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत