भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. संबधित सदस्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून तो संघासोबत डरहॅमला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आणखी ३ कोचिंग असिस्टंटनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील आणखी चार सदस्य डरहॅमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंचा समावेश आहे. या चौघांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. इंग्लंड क्रिकेट संघावर करोनाचं सावट असतानाच भारतीय संघातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली. ऋषभ पंत मागील ८ दिवसांपासून विलगीकरणात आहे. दरम्यान पंतच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये आढळणारा डेल्टा व्हेरियंट पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.